भाजपाच्या पंचमसाली नेत्यांचा यत्नाळ यांच्यावर हल्लाबोल; कुडळसंगम श्रींच्या भूमिकेवर नाराजी

विजयपूर : विजयपूर शहराचे आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांना भाजपने पक्षातून निलंबित केल्यानंतर पंचमसाली समाजातील भाजप नेत्यांनी एकत्र येत जोरदार पत्रकार परिषद घेतली. यत्नाळ यांच्यावर पक्षविरोधी कारवायांसाठी टीका करत त्यांनी कुडळसंगम पीठाचे श्री बसव जय मृत्यूंजय स्वामी यांच्या समर्थनाबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली.

नेत्यांचा भाजपप्रती ठाम पाठिंबा
पत्रकार परिषदेत भाजप नेते विजूगौडा पाटील, संजय पाटील कनमडी, डॉ. सुरेश बिरादार, भिमाशंकर हदणूर, रविकांत बगली, कासूगौडा बिरादार आणि संदीप पाटील उपस्थित होते. त्यांनी राज्याध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्वाला पूर्ण पाठिंबा दर्शवत, यत्नाळ यांच्या निलंबनाचे समर्थन केले.

स्वामीजींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
संजय पाटील कनमडी यांनी स्वामीजींवर हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप करत सांगितले की, "स्वामीजींनी कधी स्वतःला हिंदू म्हणवले नाही आणि हिंदू धर्मावर टीका केली. त्यांनी स्वतंत्र लिंगायत धर्म स्थापनेच्या मागणीसाठीही आंदोलनाचे नेतृत्व केले." तसेच, त्यांनी स्वतःच्या पराभवासाठी यत्नाळ यांना जबाबदार धरले.

यत्नाळ यांची काँग्रेसशी हातमिळवणी – आरोप
विजूगौडा पाटील यांनी यत्नाळ यांच्यावर काँग्रेस नेते व जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांच्याशी संगनमत करून पक्षविरोधी कार्य केल्याचा आरोप केला. "कुटुंब आणि समझोता राजकारणावर टीका करणारे यत्नाळच अनेकदा काँग्रेसशी हातमिळवणी करतात," असे ते म्हणाले. भाजपच्या या एकत्रित भूमिकेमुळे यत्नाळ यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अधिकच अनिश्चितता निर्माण झाली आहे.

दिपक शिंत्रे