राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अहिल्यानगर – राहुरीचे भाजप आमदार आणि अहिल्यानगर जिल्हा सहकारी
बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले (वय ६६) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र
झटक्याने निधन झाले आहे. पहाटे अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना अहिल्यानगरमधील
एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी
त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने अहिल्यानगर आणि राहुरी परिसरात शोककळा
पसरली आहे. शिवाजीराव कर्डिले हे नगर-नेवासा आणि राहुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व
करणारे सहा वेळा निवडून आलेले आमदार होते. त्यांनी राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आणि इतर अनेक पदांवर कार्य करताना
लोकाभिमुख कामगिरी केली होती. त्यांच्या निधनावर सर्वच राजकीय नेत्यांनी शोक
व्यक्त केला आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहताना म्हटले,
“राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन
झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी
आहोत. त्यांचं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील.” शिवाजीराव कर्डिले यांच्या
निधनाने अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय आणि सहकारी क्षेत्राला मोठी पोकळी निर्माण
झाली आहे.