आमदार मोहिते-पाटलांवर कारवाईसाठी भाजप अखेर अॅक्शन मोडमध्ये
.jpeg)
पंढरपूर, दि.17-
भारतीय
जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना पक्षशिस्तभंग
केल्याचा ठपका ठेवत अखेर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
भाजपचे
कार्यालयीन सचिव मकरंद कुलकर्णी यांनी ही नोटीस दिली असून यातील सर्व विषय अतिशय
गंभीर असून यावर आपले काही स्पष्टीकरण असल्यास सात दिवसात लेखी स्वरूपात सादर
करावे, असे सूचित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीपासून भाजप व
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यात अंतर निर्माण झाले आहे. 2024 च्या
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी
दिल्यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी त्या निर्णयाला विरोध दर्शवत पक्षत्याग
केला व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षाकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत रणजितसिंह
मोहिते-पाटील यांनी भाजपचे काम न करता तटस्थ भूमिका घेतली होती.
तर
यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा त्यांनी माळशिरस
तालुक्यामध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारात भाग घेतला नाही.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर सातपुते यांच्यासह भारतीय जनता
पक्षातील अनेक नेत्यांनी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची पक्षातून हकालपट्टी
करावी, अशी मागणी वरिष्ठांकडे केली. जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार
यांनीही मोहिते-पाटील यांच्यावर पक्षाने कारवाई करावी, अशी
मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती.
दरम्यान, आता
राज्यात पुन्हा भाजपप्रणीत महायुतीचे सरकार आले असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
झाले आहेत. मध्यंतरीच्या काळात आमदार रणजिणसिंह मोहिते-पाटील यांनी चंद्रशेखर
बावनकुळे यांचीही भेट घेतली होती. तसेच ते पक्षाच्या बैठकांनाही हजेरी लावत होते.
त्यामुळे भाजपमध्येच संभ्रमावस्था होती. मात्र आता नागपूर अधिवेशन सुरू असताना
भाजपने आमदार मोहिते-पाटील यांच्यावर निवडणूक काळात पक्षशिस्तभंग केल्याचा ठपका
ठेवून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत दिलेल्या नोटिसीत नमूद करण्यात आले
आहे की माळशिरसमध्ये पंतप्रधान,मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री यांच्या प्रचार सभा
आयोजित केल्या असतानाही यास मोहिते-पाटील यांनी अनुपस्थिती दर्शवली होती. तसेच
लोकसभा निवडणूक काळात त्यांच्या परिवाराने भाजपच्या विरोधात काम केल्याचे
निदर्शनास आले आहे. त्यांच्या परिवारातील सदस्यांनी भाजपच्या माढा आणि सोलापूर
लोकसभेच्या जागा पाडण्यासंदर्भात जाहीर वक्तव्ये केली होती. यासह कार्यकर्त्यांनी
लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या बूथ प्रमुखांना धमकावणे, पोलिंग
एजंट मिळू न देणे असे प्रकार केल्याचे निदर्शनात आल्याचे या नोटिसीमध्ये
कार्यालयीन सचिव मकरंद कुलकर्णी यांनी नमूद केले आहे.
लोकसभा
निवडणूक मतदानाच्या दिवशी आमदार मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र
पवार गटाच्या उमेदवाराची गळाभेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला भाजपविरोधी
मतदानास प्रवृत्त केल्याचे निदर्शनास आल्याचे या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.
यासह अन्य विषय यामध्ये नमूद करण्यात आले आहेत. मोहिते-पाटील यांना या
नोटिसीसंदर्भात आपले काही स्पष्टीकरण असल्यास सात दिवसांत लेखी स्वरूपात देण्याचे
सूचित करण्यात आले आहे.
खासदार
धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माढा लोकसभेची जागा
भाजपने गमावली. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही महायुतीला सोलापूर
जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत
असणार्या चारही विधानसभा क्षेत्रात पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे येथील
भाजपमधील नेते आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर पक्षाने कारवाई करावी
याकरिता आग्रही आहेत. सतत त्यांच्या हकालपट्टीची मागणी जाहीरपणे केली जात आहे.