भाजपाने निवडणुकीत नैतिकता गमावली; लोकशाही पायदळी तुडवणारा पक्ष – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिका

सोलापूर :- मत चोरी, दमबाजी, विरोधी उमेदवारांना व नेत्यांना धमकावणे, खून, बोगस मतदान, निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन तसेच बलात्कारी, अवैध धंदे आणि ड्रग्स तस्करी करणाऱ्यांना उमेदवारी देणे अशा अनेक घटनांमुळे भाजपाने निवडणुकीच्या काळात पूर्णपणे नैतिकता गमावली आहे, असा गंभीर आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. भाजप हा लोकशाही बुडवणारा आणि संविधान पायदळी तुडवणारा पक्ष असून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आता सभ्यतेची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ सोमवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेला खासदार प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, काँग्रेस प्रवक्ते प्रा. अशोक निंबर्गी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडणूक आयोग गप्प का? – सपकाळांचा सवाल

सपकाळ म्हणाले की, निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणीचे पैसे वाटणे हे स्पष्टपणे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे. असे असताना निवडणूक आयोग गप्प का आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्या निवडणुका भय आणि प्रलोभनाच्या वातावरणात होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत, मग महामार्गासाठी कोठून?

शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, मागील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यासाठी निधी नाही, असे सांगितले जाते. मात्र शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे कोठून आले, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. तसेच समृद्धी महामार्गात २ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

सुजात आंबेडकरांचे वक्तव्य चुकीचे

वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी खासदार प्रणिती शिंदे भाजपासाठी काम करत असून त्या लवकरच भाजपात जातील, असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, सुजात आंबेडकरांचे वक्तव्य चुकीचे असून त्यांनी अशा प्रकारची विधाने यापुढे करू नयेत.