जिल्हा परिषद आवारात घुमणार पक्षांचा आवाज – मराठा सेवा संघाने केली पाण्याची सोय!

सोलापूर : वाढत्या उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याचा टंचाईमुळे वणवण भटकण्याचा धोका निर्माण होतो. यावर उपाय म्हणून मराठा सेवा संघाने एक अनोखा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषद आवारातील बागेत पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली असून, त्यांच्यासाठी कृत्रिम घरटीही बसवण्यात आली आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. मराठा सेवा संघाने पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर केला असून, हे भांडे पक्ष्यांसाठी सुरक्षित आणि नैसर्गिक पर्याय ठरते. तसेच, शहरातील काँक्रीटच्या जंगलात चिमण्यांसाठी घरटे बांधणे कठीण होत असल्याने, पर्यावरणस्नेही साहित्याने बनवलेली कृत्रिम घरटी बसवण्यात आली आहेत. संघाचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरातही पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे आणि पर्यावरण संवर्धनात हातभार लावावा. हा उपक्रम पक्ष्यांच्या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी मोठे योगदान ठरणार आहे.