कोल्हापुरात नव्या वर्षात पुन्हा मोठे राजकीय धमाके ?

विधानसभेच्या निवडणुकीमुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवीन समीकरणे
उदयाला आली. मात्र, निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. सर्वच
जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. राज्यात अन् केंद्रातही
महायुतीचे सरकार असल्याने कोल्हापूरच्या राजकारणात राजकीय धमाके होणे शक्य आहे.
त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांची पावले
महायुतीकडे वळत असल्याचे संकेत आहेत.
लोकसभा आणि विधानसभेच्या २०२४ मध्ये झालेल्या
निवडणुकीमुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवीन समीकरणे उदयाला आली आहेत. लोकसभेत
महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी विजय
मिळवला, तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भोपळाही फोडू दिला नाही. सर्वच
जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. तसेच राज्यात एकमताने महायुती सरकार
स्थापन झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने येत्या नव्या
वर्षात पुन्हा एकदा कोल्हापूरच्या राजकारणात राजकीय धमाके होणे शक्य आहे. त्यामुळे
स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांची पावले महायुती तिकडे वळत
आहेत.
सध्या यांनी कुणाची जरी भेट घेतली नसली तरी सध्याची भूमिका
तळ्यात मळ्यात आहे. वेळ आणि काळ पाहूनच हे इच्छुक महायुतीत उड्या मारणार असल्याचे
चित्र आहे. देशात भाजप आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने स्थानिक स्वराज्य
संस्थेच्या निवडणुकीत आपल्याकडे महायुतीमधीलच पक्षाची उमेदवारी असावी, अशी इच्छा आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने आपापल्या मतदारसंघात
विकास कामांना गती येईल. या मानसिकतेत अनेक जण आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक
स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जन महायुतीच्या सीमेवर आहेत.
नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या दोन आंदोलनामध्ये काही नगरसेवक जाणूनबुजून यापासून
लांब राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे नेत्यांच्या मनात ही शंकेची पाल चूकचूकली
आहे. येत्या नवीन वर्षात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका
लागण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या तिसऱ्या किंवा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्या
पर्यंत या निवडणुकीची घोषणा शक्य आहे. त्यामुळे वेळ काळ आणि आपल्या उमेदवारीचं बेत
पक्का करून काहीजण महायुतीतील तीन पक्षांत जाण्याचा बेत करत आहेत.
भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना यामधील एका पक्षात जाऊन
मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत आहेत. अनेकजण नव्या प्रभाग रचनेनुसार
महायुतीच्या इच्छुक उमेदवारंसोबत तयारीला लागले आहेत. या इच्छुकांचा ओढा सर्वाधिक
शिंदेंच्या शिवसेनेकडे असल्याचेही सांगितले जाते. निवडणुकीची घोषणा होताच
जिल्ह्यात राजकीय धमाके पाहायला मिळणार आहेत.