बेलाटी अपघात प्रकरण: मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार; स्कुल व्हॅन चालकावर कारवाईची मागणी

सोलापूर, ८ एप्रिल –
देगाव : बेलाटी रस्त्यावर मंगळवारी
दुपारी १२ वाजता झालेल्या दुर्दैवी अपघातात १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थी अनुराग
तीप्पन्ना राठोड याचा मृत्यू झाला. अनुराग हा डेगाव तांडा – बसवेश्वर नगर येथील
रहिवासी होता. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ आणि संतापाचं वातावरण निर्माण
झालं आहे. सदरील अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि मृताच्या कुटुंबीयांनी तीव्र
नाराजी व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यांची ठाम मागणी आहे की,
स्कुल व्हॅन चालक व शाळा व्यवस्थापनाविरोधात हलगर्जीपणामुळे
झालेल्या मृत्यूबाबत गुन्हा दाखल करून आरोपींना त्वरित अटक करावी.
गर्दी व संतापाच्या पार्श्वभूमीवर
पोलिसांची कारवाई:
अपघाताची माहिती वाऱ्यासारखी
पसरल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. सलगरवस्ती पोलीस तत्काळ
घटनास्थळी पोहचले आणि अपघातास कारणीभूत असलेली स्कुल व्हॅन ताब्यात घेऊन पोलीस
स्टेशनमध्ये जमा केली. पुढील तपास सुरु आहे.
अपघाताची दुर्दैवी माहिती:
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, स्कुल व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त
विद्यार्थी प्रवास करत होते. याच वेळी चालत्या गाडीतून अनुराग खाली पडला आणि त्याच
गाडीची चाके त्याच्या डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला.
पालकांचा आक्रोश व कारवाईची मागणी:
अनुरागचा मृतदेह वैद्यकीय
तपासणीसाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. मात्र, हॉस्पिटलमध्ये जमलेल्या नातेवाईकांनी ठाम
भूमिका घेत, "जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही,
तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही," असा
निर्णय घेतला आहे.