बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे निलंबन

बीड: कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे निलंबन करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत केली. या मुद्द्यावर आमदार नमिता मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री आबिटकर यांनी ही घोषणा केली. आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले की, कोविड काळात अनेक ठिकाणी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील काही प्रकरणांचा समावेश आहे. त्या अनुषंगाने चौकशी अहवालानंतर डॉ. अशोक थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी सरकारला यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांमध्ये संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर सरकारने ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.