भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने IPLअनिश्चित काळासाठी स्थगित केला; क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा

IPL 2025 Suspension : भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, सध्या सुरु असलेले आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. आयपीएलचे एकूण 16 सामने शिल्लक होते. हे 16 सामने आता नंतर खेळवण्यात येणार आहेत. मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील, याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार एअरस्ट्राईक केला. यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतीय सुरक्षा दलांनी भारताच्या अनेक सीमावर्ती भागात पाकिस्तानने केलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले वेळीच उधळून लावले आहेत. मात्र, या हल्ल्याचा परिणाम आयपीएलवर दिसून आला. धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सीझनमधील 58 वी मॅच सुरू होती, ती मध्येच थांबवण्यात आली आहे.