बीसीसीआयची बैठक पार पडली; 16-17 मेपासून आयपीएल सुरू
.jpeg)
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर
आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक सोमवारी जाहीर केले जाऊ शकते. असे
सांगितले जात आहे की आयपीएलचे उर्वरित सामने 16 किंवा 17 मे पासून सुरू होऊ शकतात. विशेष म्हणजे लीगचा अंतिम सामना कोलकाता
व्यतिरिक्त इतर कोणत्याही शहरात खेळला जाण्याची दाट शक्यता आहे.
बीसीसीआय-आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची चर्चा
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएलला स्थगिती देत
एका आठवड्याने पुढे ढकलण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला होता. दरम्यान, शनिवारी (दि.11) युद्धबंदीची घोषणा झाली. या
पार्श्वभूमीवर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आणि बीसीसीआय अधिकाऱ्यांनी रविवारी
(दि. 11) आयपीएल पुन्हा सुरू करण्याच्या शक्यतेवर चर्चा
केली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, ‘बोर्ड
योग्य वेळापत्रकावर काम करत आहे. सध्या आयपीएलबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
बीसीसीआयचे अधिकारी यावर उपाय शोधत आहेत. बीसीसीआय सचिव, आयपीएल
अध्यक्ष फ्रँचायझींशी चर्चा करत आहेत, त्यामुळे लवकरच
सर्वांना निर्णय कळेल. स्पर्धा लवकरच पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’
खेळाडूंना परत बोलावण्यास सांगितले
आयपीएलच्या सूत्रांनी सांगितले की, लीगची सुरुवात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)
यांच्यातील सामन्याने होईल. यापूर्वी हा सामना लखनौ येथे 9
मे रोजी खेळला जणार होता. दरम्यान, सर्व संघांना त्यांच्या
खेळाडूंना परत बोलावण्यास सांगण्यात आले आहे.
अंतिम सामना अहमदाबादमध्ये रंगणार?
सूत्रांनी असेही सांगितले की, हैदराबादमध्ये होणाऱ्या क्वालिफायर 1आणि
एलिमिनेटरच्या ठिकाणांमध्ये बदल केले जाणार नाहीत परंतु अंतिम सामना कोलकातामध्ये
होण्याची शक्यता कमी आहे. अंतिम सामना 1 जून रोजी खेळवला
जाण्याची शक्यता आहे आणि त्या दिवशी शहरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. सूत्रांनी
सांगितले की, प्लेऑफ टप्प्यासाठी सध्याच्या ठिकाणांमध्ये
कोणताही बदल झालेला नाही परंतु पावसामुळे कोलकाता येथील अंतिम सामन्यावर परिणाम
होऊ शकतो. अशा परिस्थितीत, अहमदाबादमध्ये विजेतेपदाचा सामना
खेळवला जाऊ शकतो.
भारत सरकारची परवानगी आवश्यक
पीटीआयशी बोलताना बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले
की, ‘येत्या काही दिवसांत आम्ही फ्रँचायझी, ब्रॉडकास्टर्स,
प्रायोजक आणि सामने आयोजित करणाऱ्या राज्य संघटनांशी चर्चा करू.
त्यानंतरच लीग सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ. आयपीएलचा हा हंगाम एका महत्त्वाच्या
टप्प्यावर होता. उर्वरीत सामने पुन्हा सुरू करण्यासाठी, भारत
सरकारची मान्यता आवश्यक असेल.’