बार्शी : महिलेच्या धमकीमुळे तरुणाची आत्महत्या; गुन्हा दाखल

बार्शी : आगळगाव (ता. बार्शी) येथे एका महिलेने तरुणास "माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला पैसे आणून दिले नाहीस. भेटायला घरी आला नाहीस तर पोलिसांत तक्रार देऊन तुला अडकवते," अशी धमकी दिल्यामुळे तरुणाने राहते घराजवळील पत्र्याच्या शेडला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर बार्शी तालुका पोलिस ठाण्यात संशयित महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव सागर रामचंद्र नारायणकर (वय 25) असे आहे. त्याच्या वडिलांनी, रामचंद्र नारायणकर (वय 66) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (ता. 12) दुपारी साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. फिर्यादीनुसार, संशयित महिला सागरवर सतत दबाव टाकत होती. ती त्याला पैसे आणून देण्यास भाग पाडत होती. तसेच, "तू मला पैसे दिले नाहीस किंवा भेटायला आला नाहीस तर तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करेन," अशा प्रकारच्या धमक्या ती देत होती. मंगळवारी दुपारी संशयित महिला सागरच्या घरी आली आणि त्याच्याशी वाद घालून धमकी देऊन निघून गेली. या घटनेनंतर काही वेळातच सागरने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.