वाघ, बिबट्यामुळे बार्शी तालुका भयग्रस्त धस पिंपळगावात पाळीव प्राण्यांवर बिबट्याचा पुन्हा हल्ला
.jpeg)
बार्शी:बार्शी तालुक्यातील वाघ आणि बिबट्याचा वावर कायम असल्याने ग्रामीण भागातील नागरिक भयग्रस्त आहेत. बुधवारी रात्री तालुक्यातील धस पिंपळगावात शेतकर्यांच्या पाळीव प्राण्यांवर बिबट्याने पुन्हा हल्ला केल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
बार्शी व येडशी परिसरात असलेला वाघ आता वाशी तालुक्यात गेल्याची माहिती समोर आली आहे. तत्पूर्वी वाघाला पकडण्यासाठी आलेल्या ताडोबाच्या पथकालाही वाघाने हुलकावणी दिल्याने वाघाची दहशत कायम आहे. दुसरीकडे वाघाला पकडण्याच्या प्रयत्नांत बिबट्या रात्रीच्या वेळी तालुक्यातील वस्त्यांवर येऊन शेतकर्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहे. बुधवारी रात्री बार्शी तालुक्यातील धस पिंपळगाव येथील शेतकरी समाधान मुळे, रामेश्वर धस, उत्रेश्वर धस यांच्या पाळीव प्राण्यांवर बिबट्याने पुन्हा हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने धस यांच्या दोन वासरांचा जीव घेतला.
दरम्यान, मागील दीड महिन्यापासून बार्शी तालुक्यातील वाघ आणि बिबट्या या वन्यप्राण्यांची दहशत संपणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. बार्शी तालुक्यात वाघाचे दर्शन होण्याआधी बिबट्या ट्रॅप कॅमेर्यात कैद झाला होता. नंतरच्या काळात वाघाला पकडण्याच्या गोंधळात बिबट्या मात्र मोकाट सुटला. बार्शी तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर रात्री-अपरात्री हा बिबट्या शेतकर्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहे. सोलापूर व बार्शी वनविभाग बिबट्याचा बंदोबस्त करण्यात आतापर्यंत अपयशी ठरले आहेत. बार्शी तालुक्यातील शेतकर्यांना आता आणखी किती दिवस या दोन्ही वन्य प्राण्यांच्या दहशतीखाली राहावे लागणार याचे उत्तर वनविभागाकडे नाही.