बांग्लादेशचे विमान नागपूरमध्ये उतरवले; तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडींग

नागपूर : ढाक्याहून दुबईला जाणार्या बांगलादेशच्या विमानात उंच आकाशात असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या विमानाचे बुधवारी मध्यरात्री 12 वाजतानंतर स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. गेले बारा तास हे विमान प्रवासी नागपुरातील विमानतळावर टर्मिनलमध्ये खोळंबून असून संबंधित एअरलाइन्सकडून प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरूवारी सकाळी दुरुस्तीनंतर हे विमान रवाना होणार असल्याची माहिती विमानतळाचे वरिष्ठ निर्देशक आबीद रुही यांनी दिली. टर्मीनल बिल्डींगजवळ उभे करण्यात आलेल्या या विमानात 400 प्रवासी असून बांगलादेश एअर लाईन्सचे कर्मचारी प्रवाशांच्या सेवेत होते. यापूर्वी 10 नोव्हेंबर 2024 रोजी विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन मिळाल्याने नागपूरवरुन कोलकाता जाणार्या इंडिगो एअरलाईनचे विमानाचे तातडीने आपत्कालीन लँडींग करण्यात आले होते. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमान रायपूर विमानतळावर उतरवण्यात आले. याशिवाय 20 जून 2024 रोजी यूएस-बांगला एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक बीएस-343 या विमानाचे इंजीनमध्ये बिघाड झाल्यामुळे इमर्जंसी लॅडिंग करण्यात आले होते. प्रवासादरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यानुसार, विमानाच्या इमर्जन्सी लॅडिंगसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संपर्क साधण्यात आला. विमानतळ प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळताच विमानाचे सुरक्षितरित्या इमर्जन्सी लॅडिंग झाले. यावेळी प्रवाशांना विमानतळावर 9 तास मुक्काम करावा लागला होता. दरम्यान, 17 जानेवारी 2024 रोजी हवाई प्रवासादरम्यान एका प्रवाशाची तब्येत बिघडल्याने प्रवाशाची प्रकृती लक्षात घेत एअर अरेबियाच्या शारजाह-चितगाव या विमानाचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लॅडिंग झाले होते. कोलकाताहून मुंबईला उपचारासाठी जात असताना विमान नागपुरच्या आकाशात असताना या प्रवाशाची तब्येत बिघडल्याने वैमानिकांनी एटीएसशी संपर्क साधून तातडीने विमानतळावर उतरवले.