बाळूमामा भंडारा उत्सव : मेंढ्यांच्या घागरींची मिरवणूक भक्तिमय वातावरणात संपन्न

मुदाळ तिट्टा : बाळूमामा भंडारा उत्सवातील महाप्रसादासाठी १९ बग्गीतील मेंढ्यांच्या घागरी एकत्र करून, त्या बाळूमामाच्या रथातून आदमापूरकडे नेण्याचा सोहळा धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. रथाच्या मिरवणुकीसाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली. मिरवणुकीदरम्यान "बाळूमामाच्या नावानं चांगभलं" अशा जयघोषाने वातावरण दणाणून गेले. भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि टाळ-मृदंगाच्या निनादात ही मिरवणूक पार पडली. निढोरी ते आदमापूर अवघ्या दीड किलोमीटरच्या अंतरासाठी ही मिरवणूक तब्बल पाच तास चालली.mसोहळ्याच्या प्रारंभी देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते रथाची विधिवत पूजा करण्यात आली. महाप्रसादातील खिरीसाठी मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी वापरण्याची जुनी प्रथा आजही पाळली जाते.
घागरींचे आगमन आणि विधी:
राज्यभरातील १९ बग्गीतील मेंढ्यांच्या घागरी भंडाऱ्याच्या आधल्या दिवशी निढोरीत एकत्र आल्या. यावेळी ग्रामस्थ आणि महिलांनी औक्षण करून घागरींचे स्वागत केले. बाळूमामाच्या रथासह या घागरी आदमापूरकडे रवाना झाल्या. द्वादशीच्या दिवशी सकाळी बाळूमामांच्या समाधीला दुग्धाभिषेक करण्यात येणार असून, उर्वरित दूध महाप्रसादासाठी वापरण्यात येईल.
भक्तांची मोठी उपस्थिती:
कर्नाटक, औरनाळ, देवगड, मिरज, मुंबई, गोवा आणि पंढरपूर यांसह विविध ठिकाणांहून आलेल्या दिंडीतील भक्तांनी रथ मिरवणुकीला साथ दिली. भक्तांसाठी मोफत खिचडी, फळे, ताक आणि सरबत यांची व्यवस्था करण्यात आली होती.
वाहतूक व्यवस्था:
रथ मिरवणुकीदरम्यान एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली. मुरगूड येथून येणारी वाहतूक सोनाली बिद्री-कोल्हापूर-गारगोटी मार्गे वळवण्यात आली.