बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरण: भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटेंचा अखेर राजीनामा
बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आणि
कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी अखेर आपल्या
पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या आदेशानंतर त्यांनी वरिष्ठांकडे राजीनामा सादर
केला असून, हा राजीनामा आज १० जानेवारी २०२६ रोजी
देण्यात आला. विशेष म्हणजे, अवघ्या कालच झालेल्या
नगरपरिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत तुषार आपटे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून
नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या नियुक्तीनंतर समाजातून आणि राजकीय वर्तुळातून
तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. विरोधकांचा आक्रमक पवित्रा आपटेंच्या
नियुक्तीनंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपने तातडीने राजीनामा घेतला
नाही, तर १३ किंवा १४ जानेवारी रोजी बदलापूरमध्ये मोर्चा
काढून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव
यांनी दिला होता. वाढता जनआक्रोश आणि राजकीय दबाव लक्षात घेत अखेर तुषार आपटेंनी
राजीनामा दिला.
भाजपवर जोरदार टीका या प्रकरणावरून विरोधकांनी भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी, “लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपने बक्षीस दिले आहे का?” असा थेट सवाल उपस्थित केला होता. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर या प्रकरणामुळे भाजपची मोठी नाचक्की झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आरोपी असूनही नियुक्तीवर संताप बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात तुषार आपटे हे सहआरोपी असून सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. अशा परिस्थितीत त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आल्याने सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचे लक्षात येताच अखेर आपटेंनी स्वतःहून राजीनामा दिला.
राजीनामापत्रातील मजकूर आपटेंनी दिलेल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे, “माझी कुळगाव–बदलापूर नगरपरिषद स्वीकृत/नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मी आज दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी या पदाचा स्वखुशीने राजीनामा देत असून, तो स्वीकारण्यात यावा.” बावनकुळे यांचा इशारा ठरला निर्णायक दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना येथे माध्यमांशी संवाद साधताना, “ज्यांनी चूक केली आहे त्यांच्यावर योग्य आणि निष्पक्ष कारवाई होईल,” असे स्पष्ट केले होते. या वक्तव्यानंतर काही वेळातच तुषार आपटेंचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.