रामनवमीला लाखो दिव्यांनी उजळून निघेल अयोध्या

अयोध्या : भगवान श्रीराम यांच्या जन्मस्थळी म्हणजेच अयोध्येत यंदा रामनवमीचा उत्सव अभूतपूर्व पद्धतीने साजरा होणार आहे. रविवार, ६ एप्रिल रोजी होणाऱ्या रामनवमी निमित्त दोन लाखांहून अधिक दिव्यांनी अयोध्या उजळून निघणार असून, प्रथमच भाविकांवर सरयू नदीचे पवित्र पाणी ड्रोनद्वारे शिंपडले जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार, यंदा रामनवमीचा उत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. अष्टमी आणि नवमीच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राम कथा पार्कजवळ होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये देशातील प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत. यंदा पहिल्यांदाच रामनवमीनिमित्त दीपोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे. ‘राम की पैडी’ आणि राम कथा पार्कसमोरील पक्का घाट येथे लाखो दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. तसेच, अष्टमीच्या दिवशी कनक भवनपासून ‘हेरिटेज वॉक’ काढण्यात येणार असून, राम कथा पार्क येथे त्याची सांगता होईल. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता, राम मंदिर ट्रस्टने दर्शनाचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात सुविधा पुरवण्यात येणार असून, अन्न-वाटप केंद्रे, पिण्याचे पाणी, आरोग्य शिबिरे आणि शौचालये यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी यांच्या माहितीनुसार, या उत्सवात तंत्रज्ञान आणि परंपरेचे अनोखे मिश्रण पाहायला मिळणार आहे. “सरयू मातेवरील श्रद्धा जपत ड्रोनद्वारे पवित्र जल शिंपडण्याची योजना आहे. यामुळे भाविकांना आध्यात्मिक आणि आधुनिकतेचा संगम अनुभवता येईल,” असे त्यांनी सांगितले.