छत्रपती संभाजीनगरमध्ये ७०० बोगस मतदारांचा दावा; विरोधकांसह सत्ताधारीही आक्रमक, प्रशासनाची धावपळ

छत्रपती संभाजीनगर  राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा धुरळा उडालेला असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शहरात एकाच वेळी तब्बल ७०० बोगस मतदार पकडल्याचा दावा विविध राजकीय पक्षांनी केल्यामुळे राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे. शहरातील मुकुंदवाडी परिसरातील ए-वन’ हॉटेल तसेच राजर्षी शाहू शाळेजवळील मतदान केंद्रावर हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने संशयास्पद व्यक्ती मतदानासाठी आल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. बोगस मतदानाचा संशय येताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस व सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या प्रकारामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत तपास सुरू केला आहे. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे या दाव्याची शहानिशा केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, निवडणूक आयोग किंवा अधिकृत प्रशासनाकडून अद्याप ७०० बोगस मतदारांच्या दाव्याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.