१ मेपासून एटीएममधून पैसे काढणं महाग; मोफत मर्यादा ओलांडल्यास आता २३ रुपये शुल्क

मुंबई, २९ एप्रिल – येत्या १ मे २०२५ पासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार
आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एटीएम व्यवहारांवरील
शुल्क वाढवण्यास मान्यता दिली असून, आता मोफत व्यवहारांच्या
मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहारासाठी २१ ऐवजी २३ रुपये शुल्क आकारले जाईल. बँका आणि
थर्ड पार्टी एटीएम ऑपरेटर यांनी एटीएम संचालन खर्च वाढल्यामुळे शुल्कवाढीची मागणी
केली होती. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) यास
पाठिंबा देत RBI कडे शिफारस केली होती, ज्यावर आता मुहर लागली आहे.
मोफत मर्यादेनंतर वाढीव शुल्क
आत्तापर्यंत बँकेच्या किंवा इतर एटीएममधून मोफत
व्यवहारांच्या मर्यादेनंतर पैसे काढताना ग्राहकांकडून २१ रुपये शुल्क घेतले जात
होते. मात्र आता हे शुल्क २३ रुपये असेल. त्यामुळे महिन्यात मोफत व्यवहारांची
मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक वेळी २ रुपये जास्त मोजावे लागतील. मोफत
व्यवहारांची मर्यादा पूर्ववत बँकेच्या एटीएममधून दरमहा ५ मोफत व्यवहार आणि मेट्रो
शहरांमध्ये इतर बँकांच्या एटीएममधून ३ मोफत व्यवहारांची सवलत कायम राहणार आहे.
नॉन-मेट्रो भागात ही मर्यादा ५ व्यवहारांपर्यंत आहे. त्यामुळे ग्राहकांनी ही
मर्यादा लक्षात घेणे गरजेचे आहे.
वाढीव शुल्क टाळण्यासाठी पर्याय कोणते?
– फक्त मोफत मर्यादेत व्यवहार करा
– रोख व्यवहार टाळा आणि डिजिटल पेमेंटचा वापर वाढवा
– UPI, मोबाईल वॉलेट आणि नेट बँकिंग यांचा अधिक वापर करा