असीम मुनीर यांचे भडकावू भाषण: पाकिस्तान काश्मीरला मदत करत राहील

नवी दिल्ली – पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात भडकावू वक्तव्य केले आहे. कराचीत पाकिस्तानी नौदल अकादमीच्या पासिंग आउट परेडमध्ये बोलताना त्यांनी काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना समर्थन दर्शवले. मुनीर म्हणाले, भारत ज्याला दहशतवाद म्हणतो, तो एक वैध संघर्ष आहे. पाकिस्तान नेहमीच काश्मिरी लोकांच्या पाठीशी उभा राहील.” त्यांनी पुढे इशारा दिला की, जर भारताने हल्ला केला, तर पाकिस्तानही प्रत्युत्तर देईल. आम्ही हे दोनदा केले आहे – एकदा २०१९ मध्ये बालाकोट एअर स्ट्राइकवेळी, आणि आता ऑपरेशन सिंदूरच्या वेळी.”

🔹 ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.

यावेळी पाक सैन्याने भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय संरक्षण दलाने कठोर प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर कारवाई केली. तणाव वाढल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू करण्यात आली.

🔹 भारताचा ठाम पवित्रा
भारताने कायमच काश्मीरमधील हिंसाचाराला पाकिस्तानची ‘राज्यपुरस्कृत दहशतवादी कारवाया’ असे संबोधले आहे. असीम मुनीर यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा द्विपक्षीय तणाव उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय नौदलालाही पाकिस्तानच्या महत्त्वपूर्ण तळांवर मोठे प्रतिहल्ले करण्याची तयारी होती, मात्र उच्च पातळीवर आदेश न मिळाल्यामुळे हे हल्ले रोखले गेले.