बीडमध्ये पुन्हा खळबळजनक प्रकार; तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रकार ताजा असतानाच बीड जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. परळी येथे एका तरुणाचे अपहरण करून त्याला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा भीषण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शिवराज हनुमान दिवटे (वय, परळी) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी समाधान मुंडे व अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास शिवराज दिवटे जलालपूर येथील अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमातून परतत असताना, रिलायन्स पेट्रोल पंपाजवळून त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला टोकवाडी येथील रत्नेश्वर मंदिर परिसरात नेऊन लाठ्या, काठ्या व बेल्टने अमानुष मारहाण करण्यात आली.

दहशतीचा प्रकार व्हिडीओत कैद:
या मारहाणीचा व्हिडीओ समाधान मुंडेच्या साथीदारांनी स्वतः चित्रीत केला आणि तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडीओत शिवराजला जमिनीवर पाडून चारही बाजूंनी आरोपी मारहाण करताना दिसत आहेत. शिवराज जोरजोरात ओरडत असतानाही मारहाण सुरूच होती.

आरोग्य स्थिती व पोलिस तपास:
या मारहाणीत शिवराज गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड पोलिसांनी समाधान मुंडे आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेने परळीसह बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.