छत्तीसगडमध्ये नलक्षवाद्यांकडून पुन्हा  स्फोट

नारायणपूर: छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात शुक्रवारी नलक्षवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीमा सुरक्षा दलाचे (BSF) दोन जवान जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. आज सकाळी गरपा गावाजवळ बीएसएफ पथक गस्त घालत असताना ही घटना घडली.गरपा कॅम्प आणि गरपा गावादरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. यात दोन बीएसएफ जवान जखमी झाले आहेत, असे नारायणपूरचे पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी सांगितले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी गुरुवारी शेजारील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाल्याने सीआरपीएफच्या कोब्रा युनिटचे दोन कमांडो जखमी झाले होते. १२ जानेवारी रोजी सुकमा जिल्ह्यातील एका घटनेत १० वर्षांची एक मुलगी जखमी झाली. तर विजापूर जिल्ह्यात अशाच प्रकारच्या आयईडी स्फोटात दोन पोलिस जखमी झाले होते. दोन दिवसांपूर्वी नारायणपूर जिल्ह्यातील ओरछा भागात झालेल्या अशाच दोन वेगवेगळ्या घटनांत एका गावकऱ्याचा मृत्यू झाला होता. तर तिघे जखमी झाले होते.