सोलापुरात आणखी एका डॉक्टरने केली आत्महत्या . राहत्या घरी गळा चिरून जीवन संपवले

सोलापूर, दि. 29 - येथील मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी  आपल्या घरात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच  आता सोलापुरात आणखी एका शिकाऊ डॉक्टरने गळा चिरून घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्र पुन्हा एकदा हादरले आहे.  आदित्य नमबियार असे आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. आदित्य याने अलीकडेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्याने शिकाऊ डॉक्टर म्हणून येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात  आपल्या कार्याला सुरुवात केली होती. तो सोलापूरात भाड्याने घर घेऊन राहत होता.  त्या राहत्या घरात गळा कापून घेत त्याने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. एकीकडे सोलापूरात डॉ. शिरीष वळसंगकर यांचे आत्महत्या प्रकरण गाजत असताना आता शिकाऊ डॉक्टरने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.