सुधागड अभयारण्यात अंधारबन जंगलट्रेक व कुंडलिका व्हॅली पर्यटनावर अनिश्चित काळासाठी बंदी

पुणे : सुधागड अभयारण्यात येणाऱ्या अंधारबन जंगलट्रेक आणि
कुंडलिका व्हॅली या लोकप्रिय पर्यटनस्थळांवर आता पर्यटकांना अनिश्चित काळासाठी
प्रवेश बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी सुटीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने
पर्यटकांची गर्दी होत असल्यामुळे नैसर्गिक अधिवासाला आणि वन्यजीवांना मोठा धोका
निर्माण झाला होता. वन विभागाचे उपवनसंरक्षक (वन्यजीव) राहुल गवई यांनी गुरुवारी
यासंदर्भातील आदेश जारी केला. शुक्रवारी (४ जुलै) पासून या आदेशाची अंमलबजावणी
सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांत कुंडलिका भागात झालेल्या अपघातांच्या
घटनांमुळेही प्रशासन सतर्क झाले होते. यावर्षी शनिवारी-रविवारी सकाळी एकाच वेळी
तब्बल ३,००० पर्यटकांनी प्रवेश मागितला, तर आणखी हजारो लोक तिकिटाच्या रांगेत उभे होते. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे
अशक्य होत असल्याने तातडीने तिकीट खिडकी बंद करावी लागली. वन विभागाने स्पष्ट केले
की, एवढ्या मोठ्या प्रमाणात जंगलात जाणारे पर्यटक केवळ
पर्यावरणाचे नुकसान करत नाहीत, तर वन्यजीवांच्या
अस्तित्वालाही बाधा पोहोचवतात.
राहुल गवई म्हणाले: "वन्यजीव विभागाकडे मर्यादित मनुष्यबळ
आहे. पर्यटकांकडून वारंवार नियमभंग केला जातो. त्यामुळे अनिश्चित काळासाठी
प्रवेशबंदी लागू केली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर वन्यजीव संरक्षण
अधिनियम १९७२ नुसार कडक कारवाई केली जाईल." सध्या या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये समाधान व्यक्त
होत असले तरी अनेक पर्यटक निराश झाले आहेत. पुढील काळात या बंदीचे परिणाम कसे
दिसतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.