बालविवाहाचा संतापजनक प्रकार; बीडमध्ये तेरा वर्षीय मुलीचा दोन वेळा विवाह

बीड | बीड शहरातील शाहूनगर परिसरात एक अल्पवयीन 13 वर्षीय मुलगी दोन वेळा विवाहबद्ध करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ही मुलगी नुकतीच पाचवी उत्तीर्ण झाली होती. तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने लग्न लावण्याचा निर्णय घेतला. पहिला विवाह आणि पळालेला पती सुरुवातीला 32 वर्षीय पुरुषाशी तिचा विवाह लावण्यात आला, मात्र तो आधीच विवाहित असल्याचे नंतर समोर आले. त्याच्या पहिल्या पत्नीला लग्नाची माहिती मिळताच तो पळून गेला. दुसरा विवाह आणि पोलिस कारवाई यानंतर तत्काळ दुसऱ्या व्यक्तीशी या मुलीचा विवाह लावण्यात आला, पण ही माहिती प्रशासनाच्या कानावर गेल्यानंतर, पोलिसांनी दुसऱ्या नवरदेवाला रस्त्यात अडवून ताब्यात घेतले. सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही घटना समोर येताच बीडमध्ये बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणा किती सजग आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.