लोकसहभागातून करणार जलसाठ्यांचे संवंर्धन चेन्नईच्या संस्थेचे सहकार्याने खासदार प्रणिती शिंदे यांचा उपक्रम

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील चार गावांतील पाणी प्रश्न
सोडविण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून नवीन योजना जाहीर करण्यात आली
आहे. लोकचळवळीतून ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचे खासदार शिंदे यांनी
सांगितले. मंगळवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार शिंदे
यांनी या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. या योजनेतून मोहोळ, मंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी भागात जलसंधारणाच्या कामाला
लवकरच सुरुवात केली जाणार आहे. चेन्नई येथील एन्व्हायरमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ
इंडिया ( इएफआय) या संस्थेच्या वतीने सीएसआर अंतर्गत जलसंधारणाचे काम सुरु केले
जाणार असल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली. सोलापूर जिल्हा हा पर्जन्य छायेचा
प्रदेश म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला,
पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट
तालुक्यातील काही भाग अद्यापही दुष्काळीच आहे. या भागातील दुष्काळाचा डाग पुसावा
यासाठी जलसंधारणाच्या योजना राबवाव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात
आहे. दरम्यान, गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत
असताना मी मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासह अक्कलकोट आणि
मोहोळ तालुक्यातील दुष्काळी भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न करणार
असल्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी आम्ही केंद्र सरकार, राज्य
सरकार यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. त्याशिवाय काही पर्यावरणप्रेमी संस्थांच्या
माध्यमातून देखील जलसंधारणाची कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती त्यांनी
दिली. या जलसंधारणाच्या कामासाठी खासदार शिंदे यांच्या प्रयत्नातून चेन्नई येथील
पर्यावरणप्रेमी फाउंडेशन ऑफ इंडिया ही
संस्था सोलापूर जिल्ह्यातील जलसाठे पुनर्संचयित करण्याचे काम हाती घेणार आहे. ही
सर्व कामे सामाजिक जबाबदारी अंतर्गत केली जाणार असून यासाठी शासनाकडून कोणत्याही
प्रकारचा निधी घेतला जाणार नाही. प्रारंभी मोहोळ तालुक्यातील वाफळे, अक्कलकोट तालुक्यातील गाव तसेच मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी-दहिवडी आणि
डोंगरगाव या गावांतील जलसाठे पुनर्संचयित करण्याचे काम केले जाणार आहे. तलावांमधील कचरा, अवशेष
आणि अतिक्रमित वनस्पतींचे स्वच्छता करणे, तलावांचे
गाळनिर्मूलन आणि खोलीकरण करून पाणी साठवण क्षमता वाढवणे, जलभरण
विहिरी, पक्षी निवास द्वीपे, स्थानिक
प्रजातीच्या वनस्पतींचे संवर्धन करणे असे उपक्रम या अभियानात आहेत. या प्रसंगी
जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेसचे
शहराध्यक्ष चेतन नरोटे, इएफआय या संस्थेचे संस्थापक अरुण
कृष्णमूर्ती. सी. यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.