पहलगाम हल्ल्यातील तिन्ही दहशतवादी ठार; अमित शाहांनी लोकसभेत दिली माहिती

नवी दिल्ली (२९ जुलै २०२५): — संसदेत आजही पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर जोरदार चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत 'ऑपरेशन महादेव' संदर्भात सविस्तर माहिती दिली. शहा म्हणाले, “पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप पर्यटकांची हत्या झाली, मी याचा तीव्र निषेध करतो. २२ मेपासून सुरक्षा दलांनी 'ऑपरेशन महादेव' सुरू केलं आणि त्यात तिन्ही दहशतवादी - सुलेमान, जिब्रान आणि अफझल - ठार करण्यात आले. त्यांच्या मदतीसाठी काम करणाऱ्या दोन स्थानिकांना अटक करण्यात आली आहे.” गृहमंत्री पुढे म्हणाले की, २२ मे रोजी आयबीला दाचीगाम परिसरात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर सतत एका महिन्याहून अधिक काळ शोधमोहीम राबवून २२ जुलै रोजी त्यांचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला. सशस्त्र जवान, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तीन रायफल्ससह दहशतवाद्यांना ठार केले. या हल्ल्यांत वापरलेल्या रायफल्स त्या घटनास्थळीच सापडल्या, असा दावा गृहमंत्र्यांनी केला. काँग्रेसवर निशाणा साधत, अमित शहा म्हणाले की, “काल काँग्रेसने विचारलं की दहशतवादी कुठून आले? आमच्यावर आरोप करणारे माजी गृहमंत्री चिदंबरम यांना मी विचारतो – पाकिस्तानातून दहशतवादी येतात याचा पुरावा मागणं म्हणजे काय तुम्ही पाकिस्तानला वाचवू पाहताय का?” शहांनी स्पष्ट केलं की, मोदी सरकारने 'ऑपरेशन सिंदूर' 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत दहशतवाद्यांचा बंदोबस्त केला आहे आणि हल्ल्यातील पीडित कुटुंबांना न्याय मिळवून दिला आहे.