मुंबईसह सर्व महापालिका स्वबळावर लढणार,ठाकरे गटाची मोठी घोषणा.
.jpeg)
मुंबई: मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे. “मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार?” असा सवाल संजय राऊत यांनी केला. पुढे ते म्हणाले, “आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपले पक्ष मजबूत करावे”, असे संजय राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने सरशी घेत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस सातत्याने समोर येत होती. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. एकीकडे राज्यातील सर्वच पक्षांकडून महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडुन मोठी घोषणा करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाकडे जास्तीत जास्त महापालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत असाव्या यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. यातच आता संजय राऊत यांच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष नेमकी काय भूमिका घेणार? याकडे लक्ष राहणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची मित्रपक्षावर टीका विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवत आपली सत्ता कायम टिकवली. यावेळी महाविकास आघाडीला बसलेल्या फटक्यानंतर नितीन राऊत यांनी लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या, असा मविआला टोला लगावला. तर अमोल कोल्हे यांनी काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही आणि शिवसेनेला अजून जाग येत नाही, असे म्हणत मित्रपक्षांवर निशाण साधला होता.