अक्कलकोट श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम दसऱ्यापर्यंत पूर्णत्वास

अक्कलकोट :
अक्कलकोटचे ग्रामदैवत असलेल्या श्री मल्लिकार्जुन मंदिराचे बांधकाम विजयवाडा येथील
स्टील ग्रेनाईट या दगडातून सुरू असून दगडी बांधकाम असणारे हेमाडपंथी
मंदिराचे सभामंडप, जिर्णोद्धाराचे काम दसरा पर्यंत होईल असे
मल्लिकार्जुन मंदिर ट्रस्टवतीने सांगण्यात आले. गेल्या अडिचशे वर्षाहून अधिक
काळाचा इतिहास असलेल्या अक्कलकोटचे ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी
श्री स्वामी समर्थ दर सोमवारी जात होते असा उल्लेख अनेक साहित्यात आहे. सुमारे २५०
वर्षीपूर्वीचे मंदिर पाडून नव्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या
श्रीशैल्यम मल्लिकार्जुन मंदिराच्या धर्तीवर सध्या काम सुरू आहे.१४०० टन ग्रेनाईट च्या माध्यमातून
मंदिराचे बांधकाम सुरू असून यासाठी १४ तामिळनाडूतील कामगार आले आहेत. ते गेले
कित्येक दिवसापासून दगड घडविण्याचे व नक्षीकाम करीत आहेत. अक्कलकोट स्टॅण्ड समोर
३००० स्क्वेअर फूट जुन्या मंदिरांच्या जागेवर दक्षिणात्य शैलीत या मंदिराची उभारणी
केली जात आहे. कांचीपुरम येथील टेम्पल आर्ट चे इंजिनियर वरदराजन यांच्यावर कामाची
जबाबदारी आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत चार
कोटी निधी मंजूर करून घेतला आहे.,या बांधकामासाठी एकूण सहा
कोटी खर्च असून भक्तांमधून देणगी गोळा
करण्यात येत आहे. भाविकांनी या मंदिराच्या बांधकामासाठी देणगी द्यावी असे आवाहन
मल्लिकार्जुन ट्रस्टवतीने करण्यात आले आहे. मंदिर बांधकामाच्या देखभालीसाठी
देवस्थानाचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी,मिलन कल्याणशेट्टी,
प्रशांत लोकापूरे, सुनिल गोरे,शिवराज स्वामी, महेश हिंडोळे आदी जण काम करत आहेत.