सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री; शपथविधी उद्याच?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या
बातम्यांनंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली अनिश्चितता तातडीने दूर
करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या आहेत. अजित पवारांकडे
असलेल्या उपमुख्यमंत्री पदासह महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कोणाकडे सोपवायच्या, यावर पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार (Sunetra
Pawar) यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी याबाबत स्पष्ट संकेत
देत, उपमुख्यमंत्री पदाची जागा तातडीने भरली पाहिजे, असे मत व्यक्त केले. “पक्ष आणि सरकारचे काम थांबून चालणार नाही. शो
मस्ट गो ऑन,” असे भुजबळ म्हणाले.
काय म्हणाले छगन भुजबळ?
भुजबळ यांनी सांगितले की, या घडामोडींमुळे पक्षाला मोठा धक्का बसला
असला तरी शासनाची घडी विस्कटू नये, यासाठी त्वरित निर्णय
आवश्यक आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपवावी, असे
अनेक आमदारांचे मत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उद्या आमदारांची महत्त्वाची बैठक
शनिवार, 31 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार
आहे. या बैठकीत विधीमंडळ पक्षनेत्याची निवड केली जाणार असून, सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत झाल्यास त्याच दिवशी उपमुख्यमंत्री
पदाचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा
या घडामोडींनंतर गुरुवारी रात्री राष्ट्रवादी
काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची
माहिती आहे. याआधी नेत्यांनी बारामतीत जाऊन सुनेत्रा पवार यांच्याशीही चर्चा
केल्याचे समजते. प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाच्या खात्यांचे वाटप
लवकर करण्यावर भर दिला जात आहे.
पक्षांतर्गत नव्या रचनेची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री पदाबरोबरच पक्षाच्या
संघटनात्मक पातळीवरही बदल होऊ शकतात. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद आणि प्रफुल्ल
पटेल यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी
देण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आता शनिवारी होणाऱ्या आमदारांच्या
बैठकीकडे लागले असून, त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला नवे
नेतृत्व मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.