एअर इंडिया विमान अपघात: दोन आठवड्यांनंतरही कारण स्पष्ट नाही

नवी दिल्लीदोन आठवड्यांपूर्वी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. या दुर्घटनेत २४२ प्रवाशांपैकी केवळ एकच जीव वाचला होता. उर्वरित सर्वांचा मृत्यू झाला. अपघातानंतर विमानाचे ब्लॅक बॉक्स व इतर तांत्रिक घटक तपासले जात असून आता संशयाची सुई इंजिन बिघाडाकडे वळली आहे. तपास यंत्रणांनी आणि एअर इंडियाच्या वैमानिकांनी सिम्युलेटर चाचणीद्वारे अपघाताची पुनरावृत्ती केली. त्यात असे आढळले की फक्त लँडिंग गियर अर्धवट उघडे असणे किंवा विंग फ्लॅप्स बंद असणे हे अपघातासाठी पुरेसे नव्हते. यात आणखी गंभीर बाब म्हणजे अपघातापूर्वी आपत्कालीन वीज प्रणाली (RAT) आपोआप सुरू झाली होती. ही प्रणाली तेव्हाच कार्यरत होते जेव्हा दोन्ही इंजिन एकाचवेळी बंद होतात. यावरून विमानातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला असण्याची शक्यता अधिक दृढ होते.

व्हिडिओ फुटेज आणि ब्लॅक बॉक्सच्या आधारे असेही दिसून आले की विमानाने टेकऑफ केल्यानंतर उंची गाठण्यात अपयश आले आणि थेट खाली कोसळले. सिम्युलेटर प्रयोगात लँडिंग गियर अर्धवट बंद होता, पण दरवाजे उघडलेले नव्हते. यावरून हायड्रॉलिक किंवा पॉवर सिस्टममध्ये बिघाड असल्याचा संशय वाढला आहे. विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) किंवा एअर इंडियाने अद्याप अधिकृत निवेदन दिले नसले तरी सूत्रांच्या माहितीनुसार अपघाताचे प्रमुख कारण हे तांत्रिक बिघाड असल्याचे दिसते. सध्या ब्लॅक बॉक्समधील डेटा विश्लेषण सुरू आहे.