एअर इंडियाच्या विमानात पुन्हा इंजिन बिघाड – बोईंग 777 विमान कोलकातात थांबवले
.jpeg)
कोलकाता :- अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर अवघ्या पाच दिवसांत एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली आहे. सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईकडे येणाऱ्या AI-180 या एअर इंडिया फ्लाइटला कोलकाता येथे आपत्कालीन लँडिंग करावी लागली. प्राथमिक माहितीनुसार, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. AI-180 हे बोईंग 777-200LR वर्ल्डलाइनर विमान सोमवार, 17 जून रोजी रात्री कोलकातात पोहोचले होते. ते पहाटे 2 वाजता मुंबईला उड्डाण करणार होते, परंतु डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने टेकऑफ लांबला. चार तासांच्या प्रतीक्षेनंतर, विमानाच्या कॅप्टनने पहाटे 5:20 वाजता सर्व प्रवाशांना उतरवण्याची घोषणा केली. विमानाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. प्रवासी आणि क्रू मेंबर्सना विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. व्हिडिओ फुटेजमध्ये कोलकाता विमानतळावर उभ्या असलेल्या विमानाच्या डाव्या इंजिनाची तपासणी ग्राउंड स्टाफ करत असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. ही घटना अहमदाबादमधील भीषण विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर विशेष गंभीर मानली जात आहे. त्या अपघातात लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणाऱ्या AI-171 विमानातील 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. केवळ एक ब्रिटिश नागरिक विश्वास कुमार रमेश बचावला होता. एअर इंडियाच्या सततच्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.