फोन आला तर घाबरू नका; आरोग्य, शिक्षण, रेशनसारख्या तक्रारी ‘सखी’ला थेट सांगा

सोलापूर – "मी जिल्हाधिकारी कार्यालयातून सखी बोलते आहे…" असा फोन आला, तर तो कट करू नका. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या तक्रारी थेट फोनवर ऐकण्यासाठी ‘सखी’ हे अत्याधुनिक तंत्रज्ञान सुरू केले आहे. यामार्फत आरोग्य, शिक्षण, आणि पुरवठा विभागासह विविध शासकीय सेवा संबंधित तक्रारींचे संकलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकाराने या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. एआयच्या मदतीने एकाच वेळी सुमारे पाच हजार नागरिकांना फोन जाऊ शकतो. फोनवर "तुम्ही बोलू शकता का?" असा प्रश्न विचारला जातो. नागरिकांनी होकार दिल्यावर त्यांच्या अनुभवांबद्दल प्रश्न विचारले जातात. जसे की, "तुम्हाला रेशन मिळते का?", "सरकारी दवाखान्यात जाता का?", "शाळेतील शिक्षक वेळेवर येतात का?" अशा स्वरूपाचे प्रश्न विचारून संबंधित सेवेबाबतची माहिती संकलित केली जाते. या माध्यमातून मिळालेली माहिती तक्रार म्हणून संकलित केली जाते. एकाच विभागात एकाच कर्मचाऱ्याविषयी अनेक तक्रारी आल्यास, ती बाब दखलपात्र ठरते. संबंधित विभागप्रमुखांना या तक्रारी सोपवण्यात येतात आणि त्यासाठी त्यांना विशेष डॅशबोर्ड लॉगिन देण्यात येणार आहे. या पद्धतीमुळे तक्रारींचे निवारण अधिक वेगाने आणि प्रभावी पद्धतीने होण्याची अपेक्षा आहे.