कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा; २९ वर्षानंतर लागला प्रलंबित 'निकाल'

मुंबई : कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुक प्रकरणी अजित पवार गटातील
महत्त्वाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोषी
ठरवून शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षांची शिक्षेसह ५० हजार रुपयांचा दंड
ठोठावण्याचा निर्णय नाशिक ज़िल्हा न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या
निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात
खळबळ उडाली आहे. या खटल्याची माहिती अशी कि १९९५ मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि
फसवणुकीच्या खटल्यात गुरुवारी नाशिक जिल्हा न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने मंत्री कोकाटे याना दोन वर्षांची
शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण १९९५ सालचे असून, त्यावेळी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू
सुनील कोकाटे यांच्यावर कागदपत्र फेरफार आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले होते. या
प्रकरणात तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
भादंवि कलम ४२० (फसवणूक), ४६५ (कृत्रिम दस्तऐवज तयार करणे),
४७१ (बनावट दस्तऐवजाचा उपयोग करणे) आणि ४७४ (सत्यता लपवणे) या
कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या
खटल्याचा निकाल तब्बल २९ वर्षांनी लागला असून, न्यायालयाने
माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावास २ वर्षाचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड
ठोठावला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर कोकाटे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली
आहे. अनेक ठिकाणी कोकाटेंच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दुसरीकडे,
विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, भ्रष्टाचारावरील सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी
मागणी केली आहे. त्याच्या समर्थकांनी हा निर्णय राजकीय सूडबुद्धीने घेतल्याचा आरोप
केला असून, लवकरच उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचा निर्णय
घेतला आहे.