"‘जंगली रम्मी’ प्रकरणावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे स्पष्टीकरण; विरोधकांवर बदनामीचा आरोप"

मुंबई:
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मोबाईलवर रम्मी खेळताना त्यांचा व्हिडीओ समोर आला होता, ज्यावरून त्यांच्यावर शेतकरीविरोधी व असंवेदनशीलतेचे आरोप झाले. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोकाटे यांनी या संपूर्ण प्रकारावर आपली बाजू मांडली. त्यांनी स्पष्ट सांगितले की, “माझ्या मोबाईलवर गेम डाउनलोड होता, पण मी तो खेळत नव्हतो. सदन स्थगित असताना मी यूट्यूबवर अधिवेशनाचा आढावा पाहत होतो. गेम अचानक उघडला आणि मी तो काही सेकंदात बंद केला.” ते पुढे म्हणाले, “हा अत्यंत छोटा विषय आहे. याचा विपर्यास करून विरोधकांनी राजकीय हेतूने मला बदनाम केलं आहे. माझ्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न झाला आहे. मी याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे.” कोकाटे यांनी आपण शेतकऱ्यांचा मुलगा असल्याचे सांगून, शेतीसंबंधी आपल्या कार्याचा उल्लेख केला. “मी रात्रंदिवस शेतकऱ्यांसाठी काम करतो. पीकविमा योजना, हमीभाव आणि अन्य कृषीविकास योजनेत मी पुढाकार घेतो,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पत्रकार परिषद सुरू केली होती.