तीन दिवसांच्या पायपिटीनंतर वाघ विशेष पथकाच्या टप्प्यात

बार्शी, :- बार्शी व येडशी परिसरात दहशत निर्माण करणार्या वाघाला पकडण्यासाठी ताडोबा येथून आलेल्या विशेष पथकाने मोहीम सुरू केली. पहिले दोन, तीन दिवस पायपीट केल्यानंतर वाघ पथकाच्या टप्प्यात असल्याचे सोलापूर वन विभागाने सांगितले. आता सावधपणे ही मोहीम फत्ते करण्यासाठी विशेष आखणी सुरू आहे. तत्पूर्वी ‘वॉकर-3’ ही मोहीम पूर्णत्वाला जाईपर्यंत बार्शी, येडशी परिसरातील नागरिकांनी एकटे फिरू नये, असे आवाहन बार्शी व सोलापूर वनविभागाने केले आहे. पहिल्या दिवशी येडशी, बालाघाट व बार्शी तालुका तसेच दुसर्या व तिसर्या दिवशीही या विशेष पथकाने 25 किलोमीटरपेक्षा अधिक पायी प्रवास करून शोधमोहीम सुरू ठेवली. या पथकासोबत आसपासच्या जिल्हा व तालुका वनविभागाची टीम असून साधारण 50 ते 60 जणांचे हे पथक वाघ पकडण्याची मोहीम फत्ते करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पहिल्याच दिवशी या पथकाने बार्शी व येडशी परिसरात फिरत असलेल्या या वाघाला ‘वॉकर-3’ असे नाव दिले. पथकाचे प्रमुख डॉ.रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली वाघ पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
तालुक्यातील बिबट्याचे काय? बार्शी व येडशी परिसरात वावर असलेला वाघ पकडण्याची मोहीम वेगाने सुरू आहे.
दरम्यान, ही मोहीम लवकरच फत्ते होईल, असा
विश्वास ताडोबा येथून आलेल्या या विशेष पथकाने व्यक्त केला आहे. वाघ पकडण्याची
मोहीम यशस्वी झाल्यानंतर तालुक्यात अधूनमधून दर्शन देणारा व पाळीव प्राण्यांवर
हल्ला करणार्या बिबट्याचा बंदोबस्त लगेच करणार का? असा
प्रश्न बार्शी तालुक्यातील नागरिकांचा आहे.