दहशतवादी हल्ल्यानंतर जे. पी. नड्डांचा गणपती चरणी साकडे

पुणे एप्रिल २६ : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आज पुणे दौऱ्यावर आले होते. पुण्यात आगमनानंतर त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आणि देशावर आलेल्या संकटाचे निवारण व्हावे, यासाठी बाप्पाला साकडे घातले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नड्डा म्हणाले, "काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. अशा संकटाच्या वेळी बाप्पाचे आशीर्वाद आवश्यक आहेत. मी गणपती बाप्पाला विनंती केली आहे की, देश संकटातून बाहेर पडो." दोषींना दिले जाईल योग्य उत्तर "पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. त्यासाठी दोषींना निश्चितच कठोर उत्तर दिले जाईल," असे नड्डा यांनी ठामपणे सांगितले. "मोदींच्या नेतृत्वात देश संकटावर मात करेल" "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश हे संकट पार करेल. त्यांना गणपती बाप्पाची ताकद मिळो, अशीही प्रार्थना केली आहे," असे त्यांनी नमूद केले. याचबरोबर केंद्र सरकारने या हल्ल्यानंतर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.