१७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज सुनावला जाणार

मुंबई :- मालेगाव
येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या
बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात लागणार आहे. या
स्फोटात ६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि १०० हून अधिक लोक गंभीर जखमी
झाले होते. या खटल्यात प्रमुख आरोपी भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह
ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतर पाच जणांचा
समावेश आहे. या खटल्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) सात
आरोपींना मृत्युदंडाची मागणी करण्यात आली होती. आरोपात बेकायदा कारवाया प्रतिबंधक
कायदा (UAPA), भारतीय दंड संहिता (IPC), शस्त्रास्त्र कायदा यांचा समावेश होता.
ही घटना रमजान महिन्याच्या काळात
मालेगावच्या भिक्खू चौकातील मशिदीजवळ घडली होती. स्फोटासाठी वापरण्यात आलेली
मोटरसायकल साध्वी प्रज्ञा यांच्याच मालकीची असल्याचा उल्लेख तपासात समोर आला होता.
सुरुवातीला ATS, त्यानंतर CBI
आणि अखेरीस NIAने या खटल्याचा तपास केला. खटल्याची
नियमित सुनावणी ऑक्टोबर 2018 मध्ये सुरू झाली. साध्वी
प्रज्ञा यांना जामीन मिळाला असला तरी निकाल आज लागणार आहे. दोषी ठरले तर हा
ऐतिहासिक निकाल ठरणार आहे.