अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन स्थानिक स्वराज्य संस्थांत करा

सोलापूर :  अल्पसंख्याक खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन शासन आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक हारुन अत्तार यांना देण्यात आल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनील चव्हाण यांनी दिली. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाच्यावतीने हे निवेदन देण्यात आले. 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यतेनुसार अल्पसंख्याक खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची समायोजन प्रक्रिया 15 मार्च 2024 च्या शासन आदेशानुसार राबविण्यात यावी. मराठी, कन्नड व उर्दू माध्यमातील अतिरिक्त ठरलेल्या 54 शिक्षकांचे समायोजन खासगी अल्पसंख्याक शाळेत करण्यात आले आहे. अल्पसंख्याक शाळांना अतिरिक्त शिक्षकांना रुजू करुन घेणे बंधनकारक नसल्यामुळे अद्याप शिक्षकांना रुजू करुन घेण्यात आलेले नाही. त्यामुळे शासन निर्णयातील पुढील टप्प्यानुसार या सर्व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या निवेदनावर सुनील चव्हाण यांच्यासह अप्पाराव इटेकर, अप्पासाहेब पाटील, अ. गफूर अरब यांच्या सह्या आहेत.