आदित्य ठाकरेंसह दिनो मोरिया, सूरज पांचोलीवर आरोप; दिशा सालियनच्या वडिलांची पोलिसांत तक्रार

मुंबई : -
सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात नवी घडामोड समोर आली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मंगळवारी मुंबई पोलिसांकडे आदित्य ठाकरेंसह बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया, सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती आणि तत्कालीन पोलीस अधिकारी परमबीर सिंग व सचिन वाजे यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. 
वकील नीलेश ओझा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "आम्ही मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँच कार्यालयात ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती आणि इतरांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत."

आरोप आणि तपशील:

  • परमबीर सिंग: दिशाच्या मृत्यू प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप. त्यांनी पत्रकार परिषदेत चुकीची माहिती दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
  • आदित्य ठाकरे: एनसीबीच्या तपासानुसार, ड्रग व्यवसायात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
  • दीनो मोरिया आणि सूरज पांचोली: दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या घटनांमध्ये गुंतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
  • रिया चक्रवर्ती: सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील ड्रग्ज प्रकरणात आधीच आरोपी असल्याने या तक्रारीतही त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

आगामी तपास:
मुंबई पोलिसांनी तक्रार स्वीकारली असून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू होणार आहे. वकिलांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात सीबीआय किंवा विशेष तपास पथक नेमले जावे, अशी मागणीही करण्यात येणार आहे.