एसीपी सुधीर खिरडकर यांनी भाजप पदाधिकाऱ्याला लाथ मारल्याचा प्रकार; कारवाईची मागणी

ठाणे – शहरातील किडवाई चौक परिसरात सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) सुधीर खिरडकर यांनी
भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष जिशान मोहम्मद सलीम सय्यद यांना सार्वजनिक
ठिकाणी लाथ मारल्याची घटना घडली आहे. यासंबंधीचा २८ सेकंदांचा व्हिडीओ सोशल
मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापले
आहे. घटनेबाबत भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई
करण्याचे निवेदन दिले आहे. जिशान सय्यद यांनी सांगितले की, “मी पार्किंग झोनमध्ये दुचाकीवर थांबलेलो होतो. एसीपी खिरडकर यांनी अचानक येऊन
शिवीगाळ करत लाथ मारली. वाहतूक नियम मोडल्यास कायद्याप्रमाणे कारवाई झाली असती तरी
हरकत नव्हती. मात्र मुद्दामहून टार्गेट केले.” व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की रस्त्यावर एसीपी खिरडकर यांनी गाडी थांबवून
जिशान सय्यद यांना काहीतरी सांगितले. त्यानंतर ते गाडीवरच बसलेले राहिल्याने
रागाने त्यांनी लाथ मारली. यावेळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सांगितले की, “घटनेबाबत चर्चेत गैरसमज दूर झाले असून निवेदन मिळाले आहे. आवश्यक ती कार्यवाही
केली जाईल.” भाजपा पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, पोलिसांनी नागरिकांना इज्जत देऊन वागावे, अन्यथा रस्त्यावरचा संयम सुटू शकतो. कारवाई न
झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.