मुंबईला उडवण्याची धमकी देणारा आरोपी नोएड्यातून अटकेत

मुंबईत १४ मानवी बॉम्ब घुसल्याची आणि ३४ गाड्यांमध्ये ४०० किलो आरडीएक्स ठेवून स्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्या अश्विन कुमार सुप्रा (५०) याला मुंबई गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील नोएडाहून अटक केली. तो मूळचा बिहारचा असून, धमकीसाठी वापरलेला मोबाईल फोन आणि सिम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपीला मुंबईत आणले जात आहे. गणेश विसर्जन सोहळ्यासाठी आधीच अभूतपूर्व सुरक्षा तैनात असताना ही धमकी मिळाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी ही बाब गंभीरतेने घेत तात्काळ शोधमोहीम हाती घेतली होती. स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या संयुक्त तपासातून आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आले. धमकीच्या मेसेजमध्ये मुंबईत घुसलेल्या अतिरेक्यांमध्ये फिरोज’ नावाच्या दहशतवाद्याचा उल्लेख होता. तसेच, ‘लष्कर-ए-जिहादी’ नावाच्या संघटनेचा उल्लेख प्रथमच समोर आला. धमकीनंतर शहरात बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला असून गस्त, नाकाबंदी आणि तपासणी वाढवण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा खोडसाळपणा करून मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होता. तरीही पोलिसांनी प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळले आहे.