सैफ अली खानवर खुनी हल्ला करणाऱ्या आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी
.jpeg)
मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर खुनी हल्ला करणाऱ्या बांगलादेशी आरोपीला मुंबई पोलिसांनी आज रविवारी न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. १६ जानेवारी रात्री चोरीच्या उद्देशाने आलेल्या बांगलादेशी मोहमद्द शेहजाद या आरोपीने अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केला होता.
हा हल्ला झाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवली त्यानंतर रविवारी ठाणे येथून अटक करण्यात आली होती. त्याला विशेष न्यायालयासमोर हजर केले असता. कोर्टाने म्हटले आहे की ‘आरोपी हा बांगलादेशी नागरिक असून या हल्ल्यामागे काही आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असू शकतो का याचीही शक्यता असू शकते. पोलिसांना याबाबत तपासासाठी पुरेसा वेळ मिळावा त्यामुळे पाच दिवस पोलिस कोठडी मंजूर करत आहे’. असे म्हटले आहे.
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी 35 हून अधिक पथके तयार केली होती. शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास, गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांना हिरानंदानी इस्टेटमधील एका बांधकामाच्या ठिकाणी आरोपीच्या उपस्थितीची माहिती मिळाली. त्यानंतर झोन 6 चे डीसीपी नवनाथ ढबाळे यांना माहिती देण्यात आली. डीसीपी नवनाथ यांची टीम तात्काळ पोलिस स्टेशनला रवाना झाली, सोबत गुन्हे शाखेची टीमही तिथे पोहोचली पण आरोपींना पोलिसांच्या आगमनाची माहिती मिळाली होती. त्यानंतर आरोपी बांधकामाच्या ठिकाणी दाट काटेरी झुडुपात लपून बसला होता. यानंतर गुन्हेगारी शाखा आणि पोलिसांनी आरोपीला सर्व बाजूंनी झुडुपात घेरले. त्यानंतर त्याला काटेरी झुडपांमधून अटक करण्यात आली.