जीव वाचवण्यासाठी धावत असलेला तरुण रस्त्यावर पडला

पुणे :- पुण्यातील दत्तवाडी परिसरात सोमवारी रात्री एका तरुणावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने कोयत्याने केलेला थरारक हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या हल्ल्यामुळे शहरात पुन्हा एकदा 'कोयता गँग'चा हैदोस दिसून आला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. हल्ल्याचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी परिसरात एका तरुणाचा सात ते आठ जणांनी पाठलाग केला. टोळक्याच्या प्रत्येकाकडे कोयते आणि इतर धारदार शस्त्रे होती. तरुण आपला जीव वाचवण्यासाठी धावत होता, पण तोल जाऊन पडताच टोळक्याने त्याच्यावर सपासप हल्ला केला. पहिल्याने एकाने पाठीत वार केला आणि नंतर इतरांनीही बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून फुटेज व्हायरल झाले आहे. पूर्ववैमनस्यातून हल्ला पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समोर आले आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे. पोलीस टोळीच्या सर्व सदस्यांचा शोध घेत असून लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल, असे दत्तवाडी पोलिसांनी सांगितले आहे.