वारकरी परंपरेला काळिमा संस्थाचालक महाराजाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
.jpeg)
आळंदी : अल्पवयीन मुलींचा विनयभंग होण्याच्या घटनेमध्ये राज्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्थेतील संचालकांनीच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची संताप जनक घटना आळंदी येथे उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी किरण महाराज ठोसर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ठोसरने मुलीला मारहाण करत नकोसा वाटणारा स्पर्श करत विनयभंग केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार ठोसरवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे आळंदी आणि वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. आळंदी येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा संस्थाचालक महाराजानेच विनयभंग केला. या महाराजाला आळंदी पोलिसांनी अटक केली. (वय ३३, रा. आळंदी देवाची, ता. खेड) असे त्याचे नाव आहे. ठोसर याच्या संस्थेत पिडीत मुलगी शिक्षण घेण्यासाठी निवासी राहते. गेल्या सप्टेंबर २०२४ पासून ठोसर मुलीचा विनयभंग करीत होता. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितल्यावर आईने आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. असे प्रकार आळंदीत वारंवार घडत आहेत. निवासी वस्तीगृहात गैरप्रकार घडू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी असणारा महिला व बालविकास विभाग याबाबत ठोस पावले उचलताना दिसून येत नसल्याने आळंदीकरांनी नाराजी व्यक्त केली.