तब्बल एक कि.मी.लांबीचा तिरंगा ध्वजाची मिरवणूक

विजयपूर (दि. १५ मे) : "जय जवान जय किसान", "वीर जवान अमर रहें", "भारत माता की जय" अशा देशभक्तीने भारलेल्या घोषणांनी विजयपूरचे रस्ते दुमदुमले. युवा भारत समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि भारतीय जवानांच्या आरोग्य व आत्मविश्वास वाढीसाठी आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मिरवणुकीत तब्बल १ किलोमीटर लांबीचा तिरंगा ध्वज घेऊन शेकडो युवक व युवती शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले. श्री सिद्धेश्वर मंदिराजवळून सुरू झालेली यात्रा महात्मा गांधी व मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वर्तुळावर समाप्त झाली.

मिरवणुकीमध्ये भारतमातेच्या व वीर जवानांच्या प्रतिमा असलेली सजवलेली वाहनेही सहभागी झाली होती. सैनिकांच्या पराक्रमास व समर्पणास सलाम करत देशभक्तीने भारावलेले वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर झालेल्या सभेत रामकृष्ण आश्रमाचे श्री निर्भयानंद स्वामीजी म्हणाले, "दहशतवादी राक्षसांसारखे आहेत. त्यांच्या अमानुष कृत्यांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. आपले सैनिक पराक्रम व धैर्याचे प्रतीक आहेत आणि त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेली ही यात्रा अत्यंत अर्थपूर्ण आहे." युवा भारत समितीचे संस्थापक उमेश कारजोळ म्हणाले, "क्रूर दहशतवाद्यांनी पर्यटकांचे प्राण घेऊन विकृती दाखवली. भारतीय सैनिकांनी 'ऑपरेशन सिंधूर' अंतर्गत त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे." या कार्यक्रमात शरणय्य बांदरिमठ, बसवराज यादवाड, कुमार कट्टिमणी, बसवराज पत्तार, अनिल धनश्री, विरेश गोब्बूर, संतोष झळकी, शिवपुत्र पोपडी, कलमेश अमरावती, पूजा बागी, श्रीशैल मळजी आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.