प्रदेशाध्यक्षपदासाठी नवा चेहरा

मंत्रिपदासाठी दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाल्यामुळे या नाराज नेत्यांचं पुनर्वसन करतानाच त्यांच्यापैकी कुणाला संधी द्यायची की पकातंत्र वापरत नव्या चेहऱ्याकडे नेतृत्वाची कमान द्यावी असा पेच भाजप पक्षश्रेष्ठींसमोर निर्माण झाला होता. याचदरम्यान, प्रदेशाध्यक्षपदासाठीचा चंद्रशेखर बावनकुळेच्या पुढचा वारसदार जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. जानेवारी महिन्यात शिडीला होत असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची एकमताने घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली जाणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. भाजपमध्ये 'एक व्यक्ती एक पद, असा नियम आहे. त्यानुसार बावनकुळे यांच्याकडे असलेल्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संपी मिळणार, याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक अनुभवी आणि ज्येष्ठांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अनुभवी ज्येष्ठाकडे देण्याची तयारी भाजपने केल्याचे बोलले जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्याने आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण असणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहे. यात मंत्रिपदाची संधी मिळू न शकलेले सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, डॉ. संजय कुटे यांची नावे प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. त्यात रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे.

तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. कोकणात भाजपला मोठे यश मिळाले आहे. या यशात त्यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. स्वींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहे. प्रदेशाध्यक्षपद मराठा समाजाला द्यायचे ठरले तर चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. याचवेळी जळगावमधील डॉ. संजय कुटे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी देखील चर्चेत आले आहे. ते फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात. ते बहुजनांचे नेतृत्व करत असून कुणबी समाजाचे आहेत. बावनकुळे हे तेली समाजाचे आहेत. बावनकुळे यांच्या जागी बहुजन समाजाला संधी देण्याचा निर्णय झाल्यास कुटे यांना संधी मिळू शकते, असे सांगितले जात आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात संपी मिळालेली नाही. त्यांचे पुनर्वसन कसे होणार, यावर देखील भाजप विचार करत असून, मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते देखील उत्सुक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यानिमित्ताने सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षाकडून दिली जाणार असल्याची चर्चा आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी नवीन चेहरा देण्याच्या पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र, जे.पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश असून देखील त्यांच्याकडेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद आहे. तोच फॉम्र्म्युला महाराष्ट्रात कायम ठेवायचा की नवा चेहरा द्यायचा याविषयी दोन मतप्रवाह भाजपच्या गोटात सुरू आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत बावनकुळे हे प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.