नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील लष्करी छावणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.

देवळाली कॅम्प : भारतीय लष्कराची अतिसंवेदनशील माहिती पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेला पंधरा लाखांमध्ये विकणाऱ्या लष्करी जवान संदीप सिंगला पंजाबात पोलिसांनी अटक केल्यानंतर देशभरातील लष्करी आस्थापना सतर्क झाल्या आहेत. संदीपसिंगचा जोडीदार राजबिर सिंह हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. संदीप सिंग याला अटक झाल्यानंतर देवळाली येथील लष्करी आस्थापनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठका सुरू असल्याचे समजते. त्यांनी या घटनेनंतर एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्याचे समजते.

पंधरा लाखांच्या मोबदल्यासाठी 'त्याची' पाकसाठी हेरगिरी; नाशिक कॅन्टोन्मेंटमध्ये अलर्ट जारी

भारतीय लष्कराचे अति महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र म्हणून देशभरात देवळालीचा नामोल्लेख केला जातो. या ठिकाणी देशभरातील अधिकारी व जवान यांच्यासाठी अति महत्त्वाचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच लष्करी आस्थापनाच्या अनेक महत्त्वाच्या बाबी देवळालीत आहेत. यापूर्वी देखील अशा प्रकारची लेखी व माहिती बाहेर देताना काही जवानांना लष्करी पोलीस तसेच इंटेलिजंट ब्युरोने पकडलेले आहे. नाईक संदीप सिंगचे तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यात देवळाली बाबतची माहिती शोधली जात आहे. आरोपीने माहिती पुरवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण १५ लाख रुपये घेतल्याचे उघड झाले आहे. आरोपी २०१५ मध्ये सैन्यात भरती झाला होता. संदीप सिंग हा देवळाली येथे जून 2024 पासून कार्यरत असून त्याचा साथीदार राजबिर हा देखील येथेच कार्यरत होता.