थाटामाटात ठरवलेलं लग्न दुःखांतात संपलं,चार दिवस आधीच नववधूचा दुर्दैवी मृत्यू
.jpeg)
हिप्पळगाव (ता. अहमदपूर, जि. लातूर): लग्नाची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या २० वर्षीय सुषमा श्रीमंत
जाधव हिचा लग्नाच्या चार दिवस आधीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने हिप्पळगाव गावात
शोककळा पसरली आहे. घर स्वच्छ करताना कुलरची पिन लावत असताना विजेचा शॉक बसून तिचा
जागीच मृत्यू झाला. येणाऱ्या २० मे रोजी सुषमाचा विवाह सुनील सूर्यवंशी (रा.
येलदरा, ता. जळकोट) यांच्याशी होणार होता. नुकताच
साखरपुडा पार पडलेला असताना, घरात लग्नाची तयारी, पाहुण्यांची वर्दळ सुरू होती. मंगळवारी दुपारी १ वाजता, घराची फरशी पुसताना आणि कुलरची पिन लावत असताना तिला विद्युत प्रवाहाचा
तीव्र शॉक बसला. सुषमा बी.एस्सी. पर्यंत शिक्षण घेतलेली होती. तिला उच्च शिक्षण घेऊन काहीतरी मोठं करण्याची महत्त्वाकांक्षा होती. तिचे
वडील श्रीमंत जाधव व आई चंद्रकला जाधव हे शेतकरी असून, ३ एकर
शेतीवर कुटुंबाची उपजीविका चालवत होते. कुटुंबातील मोठी मुलगी म्हणून आई-वडिलांनी
तिच्या शिक्षणासाठी कष्ट उपसले. तिच्या लग्नासाठी त्यांनी थाटामाटाची तयारी सुरू
केली होती. पण नियतीच्या क्रूर खेळाने सगळं काही क्षणात हिरावून घेतलं. या घटनेची
बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली आणि आनंदाचे वातावरण शोकाकुल झालं. दोन्ही
कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता, सुषमाचे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.