महाकुंभात ९ कोटी भक्तांनी केले स्नान..

प्रयागराज :  प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यात देश-विदेशातून लाखो भाविक हजेरी लावत आहेत. आतापर्यंत म्हणजे मंगळवारी सकाळ पर्यंत सुमारे ९ कोटींहून अधिक भाविकांनी प्रयागराजमधील त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केल्‍याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे.महाकुंभात नद्यांच्या संगमात आस्‍थेची डुबकी मारून पवित्र होण्यासाठी भाविक लाखोंच्या संख्येने येत आहेत. त्‍यामुळे इथे येणाऱ्या भाविकांचा आकडा हा दररोज वाढताना दिसून येत आहे. कोट्यवधी भाविकांना प्रवित्र स्नानाचे पुण्य देणारा महाकुंभ मेळा सोमवार १३ जानेवारी रोजी सुरु झाला आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे होणार्‍या या महाकुंभसाठी देशविदेशातून भाविक हजेरी लावणार आहेत. गंगा- यमुना या दृश्य व सरस्वती या अदृश्य नद्यांच्या संगमावर याचे आयोजन केले आहे. याबाबतेच सविस्‍तर वृत्त सीएनएन यांनी दिले आहे. जवळपास चाळीस कोटीहून अधिक भाविक या महाकुंभमेळ्यास हजेरी लावतील असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणात जमणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करणे तितकेच कठीण काम आहे. गेले वर्षभर या सोहळ्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. यासाठीची केलेली ही तयारीही अंचबित करणारी आहे. २७०० एआय संचलित कॅमेरे, अंडरवॉटर ड्रोन यासह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी केला जाणार आहे.