सोलापुरात गतवर्षी अपघातात 86 जणांनी गमावले प्राण
.jpeg)
सोलापूर: शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून अपघाती
मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गतवर्षी शहरात 86 जणांनी अपघातामध्ये प्राण
गमावले. मृत्यूची ही संख्या पाहता पोलीस व महापालिका प्रशासन आणखी किती जणांचा बळी
जाण्याची वाट पाहणार, असा सवाल सर्वसामान्यांमधून विचारला जात
आहे. शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन
दिवसांमध्ये तीन गंभीर अपघात होऊन दोघांचा बळी गेला तर एकजण गंभीर झाला. पहिला
अपघात जुना बोरामणी नाका येथे घडला. यामध्ये कंटेनरने धडक दिल्याने गाडीखाली अडकून
एकजण गंभीर जखमी झाला. चालकाने त्याला काही अंतरापर्यंत फरपटत नेले. दुसरी घटना
गुरुनानक चौकाजवळ घडली. स्कुटीवरून निघालेल्या मायलेकीला टिपरने धडक दिल्याने
आईसमोरच मुलीचा करुण अंत झाला. या घटनेने नागरिक संतप्त झाले होते. तिसरी घटना
केगावजवळ घडली. दुचाकीवरून निघालेल्या बांधकाम मिस्त्रीला कंटेनरने धडक दिल्याने
त्याचा मृत्यू झाला. यावरून शहरांमध्ये
अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. बेशिस्त वाहतुकीमुळे नागरिकांचा बळी जात
आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. 1 ते 31 जानेवारी 2024 या
कालावधीत शहरात तब्बल 86 जणांचा अपघाती मृत्यू झाला. नागरिकांच्या या मृत्यूला
जबाबदार कोण? हे टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुरक्षित व
सुरळीत होणे गरजेचे आहे. वाहन चालकांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन होते का नाही, याकडे वाहतूक पोलिसांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. नियम मोडणार्यांवर
कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. शहरातील चौकांमध्ये वाहतुकीची सतत कोंडी होत
असते. याकडेही पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणचे सिग्नल बंद आहेत त्या
ठिकाणी पोलिसांनी हातवारे करून वाहतूक नियंत्रण करणे गरजेचे आहे. वेग मर्यादा न
पाळणे, कमी वयाच्या मुलांकडून वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने व मोबाइलवर बोलत असताना वाहन चालवणार्यांवर कडक कारवाई
होणे अपेक्षित आहे. तरच अपघातांचे प्रमाण कमी होईल. शहरातील बहुतांश ठिकाणचे रस्ते
चांगले झाले असल्याने वाहने सुसाट जातात. रस्ता ओलांडणार्या पादचार्यांकडेही
लक्ष नसते. वारंवार अपघात होणार्या ठिकाणी वेग मर्यादा घालून देणे आवश्यक असून
नियम मोडणार्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक
करणे गरजेचे आहे.